मध्यंतरी आबा नावाचा एक तरूण मित्र सहज बोलताना एक अशी गोष्ट बोलून गेला, की दिर्घकाळ ती बाब माझ्या मनाच्या कोपर्यात कुठेतरी घर करून राहिली होती. पंचवीस तीस वर्षापुर्वी मुंबईच्या गिरणगावातल्या एका चाळीत छोटेखानी खोलीत त्याचे सहा भाऊ व दोन बहिणींचे कुटुंब गुण्य़ागोविंदाने नांदत होते. आईवडीलांसह दहा माणसे तेवढ्या सव्वाशे चौरस फ़ुटात कशी मावत होती, त्याचे आज त्यालाही आश्चर्य वाटते. कारण आज आईवडील नाहीत आणि सर्व भावंडे मोठी होऊन त्यांनी आपापले वेगवेगळे संसार थाटले आहेत. त्यापैकीच एका भावाने आबाला म्हटले, आपण दहाजण एकत्र असताना रविवारी अर्धा किलो मटण आणले तरी सर्वांना पुरत होते. पोटभर खाल्ल्यासारखे वाटायचे. पण आता दोन मुले आणि आणि आम्हा नवराबायकोला किलोभर मटण आणुन सुद्धा रविवार मजेत गेला असे वाटत नाही. आबालाही ते पटले होते. त्याचा प्रश्न खरा होता. तेव्हा कमी मटण असून जास्त लोकांचे पोट का भरत होते? आणि आज त्यापेक्षा अधिक मटण आणुन कमी लोकांचे पोट का भरत नाही? गणिती भाषेत मटणाच आकार व वजन वाढले आहे, त्यामुळे त्यांचे पोट भरायलाच हवे. ते गणिती आणि वैज्ञानिक सत्य आहे. पण मग त्या सत्याची या भावंडांना प्रचिती का येऊ नये?
मनातल्या मनात कुठेतरी त्याचा विचार खुप काळ चालू राहिलेला असावा. हा विरोधाभास नाही काय? कमी अन्न असताना पोट भरायचे आणि ताटात पडणारे अन्न वाढल्यावर भूक भागली नाही असे का वाटावे? तो मानसिक भ्रम असेल की अन्य काही आहे? तेव्हा एकत्र कुटुंबात आठदहा मणसे गुण्यागोविंदाने शेदीडशे चौरस फ़ुटात नांदत होती. त्यात पुन्हा गावाहुन, नात्यातून कोणी पाहुणा म्हणून टपकला, तरी जागा अपुरी पडत नव्हती. मग आता किमान तीनचारशे चौरस फ़ुटात संसार थाटणार्या, त्यांच्याच पुढल्या पिढीला घरात दोन तीन माणसे असूनही जागा अपुरी का पडते? एक पाहूणा आला तरी अडचण का वाटते? सोयी वाढल्या, मग अधिक असुविधा का जाणवते आहे? कुठे काय बिघडले आहे? घरात पैसा अधिक येतो आहे, पण प्रत्येकजण स्वत:ला दरिद्री गरीब म्हणवून घ्यायला धावतो आहे. विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकरसुद्धा आपल्या गरीबीचे खोटे प्रमाणपत्र सादर करतात. ही गरीबी कुठून आली आपल्या जीवनात? सर्व काही पुर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात मिळू लागले आहे. आणि जेवढे मिळण्याचे प्रमाण वाढते आहे तेवढे अधिक समाधानी होण्याऐवजी आपण अधिकच असमाधानी का होत चाललो आहोत? अधिकच गरीब झाल्यासारखे का वाटू लागले आहे?
एक अत्यंत अवैज्ञानिक व तर्कहीन उत्तर असू शकते. तेव्हा आपल्याला किंवा आपल्या वडीलधार्यांना जगण्यासाठी काय लागते व मिळवावे, ते नेमके ठाऊक असावे. म्हणूनच ते किती असावे, यापेक्षा काय असावे, कसे असावे, याकडे त्यांचे लक्ष होते. म्हणुनच त्यांना किती कमी मिळाले, यापेक्षा त्यातून समाधान मिळायला हवे याकडे त्यांचा कटाक्ष होता. पैसा, वस्तू, साधने यापेक्षा ते आपले बापजादे समाधान मिळवण्यासाठी झटत होते. म्हणून ते पैशाने गरीब दिसायचे. पण समाधानाने श्रीमंत होते. आपण समाधान मिळवायचेच विसरून गेलो असू कदाचित. त्यामुळे पैशापासून अनेक चैनी, सुविधा, साधने आज आपल्या पायाशी लोळण घेत आहेत. पण समाधान मात्र आपण हरवून बसलो आहोत. मग पोट भरते, पण खाल्ल्यासारखे वाटतच नाही. मग आपण पैशाने त्यांच्यापेक्षा खुप श्रीमंत झालो आहोत. पण समाधानाने त्यांच्यापेक्षा खुपच दरीद्री होऊन गेलो असू. आपण आज खुप मिळवतो आणि आणखी मि्ळवायचाच विचार अखंड करीत असतो. पण जगण्यासाठी नेमके काय मिळवायचे, तेच विसरून गेलो आहोत का आपण? खाणे ही शरीराची गरज आहे, तर समाधान ही मनाची गरज आहे. शरीराची गरज भागवताना आपण मनाला विसरून व गमावून बसलो असू काय?