शनिवार, २१ जुलै, २०१२

असेही आरक्षण


आज सकाळी बॅंकेच्या कामासाठी बांद्रा येथून बस पकडून दादरला निघालो होतो. ८७ क्रमांकाची बस सुटली तिथूनच भरून आली होती. मी मधल्या जागेत उभा होतो. तिकीट काढल्यावर पुढे ड्रायव्हरच्या मागे जाऊन उभा राहिलो. तिथे पुढल्या दरवाजाजवळ सिंगल सीट रिकामी होती. ती व मागच्या दोन जागा अपंगांसाठी राखीव असतात. तिथे बसलेल्या महिलांनी मला रिकाम्य़ा जागी बसायचा आग्रह केला. म्हटले कोणी अपंग प्रवासी येईल. पण आला तर बघू म्हणत त्यांनी आग्रहच केला म्हणून बसलो. उजवीकडे पाच सहा रांगा महिलांसाठी राखीव होत्या. त्या भरलेल्याच होत्या. बस माहिम कोळीवाड्याच्या स्टॉपला आली तेव्हा एक गर्भार महिला पुढल्या दाराने चढली. तिला बसमध्ये चढण्याचाही त्रास होतांना दिसत होता. बस सुरू झाल्यावर तिचा तोल गेला. कशीबशी सावरत ती मधल्या रिकाम्या पॅसेजकडे जाऊ लागली. तेव्हा मला अपराध्यासारखे वाटले. उठलो आणि तिला सीट देऊ लागलो. तेव्हा माझ्या मागे बसलेल्या दोन तरूण महिल्या लगेच उठल्या व त्यांनी त्या गर्भार महिलेला आपली सीट देऊ केली. पण तत्पुर्वीच मी उठलो होतो व ती गर्भार महिला माझ्या जागी स्थानापन्न झाली होती. तेव्हा मागल्या दोघींना काय वाटले देवजाणे, त्यांनी माझ्या वयाचा मान म्हणून की काय उठून त्यांच्या जागी बसण्याचा मला खुपच आग्रह चालविला. पण या सर्व गडबडीत महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवरून कोणाही महिलेला उठून त्या गर्भार महिलेला जागा द्यावी असे वाटले नाही, की तशी काही हालचाल झाली नाही. 

   राखीव जागा कशासाठी असतात? महिलांसाठी असतात तिथे महिलांचा अधिकार जरूर आहे. पण त्यातली सर्वात अवघडलेली महिला असेल तिला तशा सुरक्षित जागेची सर्वात अधिक गरज असते ना? पण महिला राखीव जागेवर बसलेल्या कुणालाही तिला जागा द्यावी असे वाटले नसेल किंवा वाटत नसेल; तर राखीव जागेचा हेतू सफ़ल होतो का? मी अपंग जागेवर बसलो होतो. बसमध्ये कोणी अपंग नक्कीच नव्हता. पण अवघडलेली महिला निदान अवस्थेने तरी स्वस्थ नव्हती, म्हणूनच मला वाटले त्या जागेवर तिचा खरा अधिकार आहे. किंबहूना तिच्याचसाठी ती राखीव जागा आहे, असे माझे प्रामाणिक मत होते. म्हणूनच मी उठलो होतो. पण मला एका गोष्टीचे खुप समाधान वाटले. मागल्या सीटवरच्या दोन तरूण महिलांनाही तसेच वाटले होते. त्यांनी माझे अनुकरण करत त्या गर्भार महिलेला जागा देऊ केली होती. जेव्हा मीच तिला जागा देऊन टाकली, तेव्हा त्यांनी वयासाठी त्यांची सीट मला देऊ केली. मी त्या जागी बसलो नाही, कारण वय वाढले असले तरी उभा राहुन प्रवास करण्याइतका अजून धडधाकट आहे. पण तो प्रवास खुप सुखाचा तेवढाच दु:खाचा वाटला. एकीकडे महिलांच्या राखीव सीटा अडवून बसलेल्या एकाही महिलेला त्या अवघडल्या गर्भार महिलेचा अधिकार ( जागा )द्यावासा वाटला नाही. पण दुसरीकडे दोन तरुणी तिच्यासाठी व नंतर वयस्कर ज्येष्ठ नागरिक म्हणुन माझ्यासाठी सीट द्यायला पुढे झाल्या.

आरक्षण किंवा राखीव जागा अत्यंत गरजूसाठी आहेत व असतात. त्या घेणार्‍यापेक्षा देणार्‍याची दानत असायला हवी, तरच आरक्षणाचा हेतू सफ़ल होऊ शकतो. ते आरक्षण सरकार वा कायद्याने दिले, त्याचा तिथे काडीमात्र उपयोग झाला नाही. कारण एका अवघडल्या गर्भार महिलेला त्या आरक्षित सीटवर महिलांनीच बसू दिले नाही. पण दुसरीकडे अन्य दोघा तरूणींनी त्यात पुढाकार घेतला. आधी त्यांनी माझ्यासोबतच तिला जागा देऊ केली आणि नंतर मी वयस्कर म्हणून मला जागा देऊ केली. त्यांनी देऊ केले त्याला मी आरक्षण मानतो. सरकार वा कायद्याने दिले ते आरक्षण नव्हे, तो नुसताच अधिकार वा हक्क आहे. गरजूला देऊ करण्यातली सहानुभूती मोलाची असते. जिथे फ़ुकट वा आयते मिळवायची हाव सुटते. तिथे आरक्षणाचा हेतू पराभूत असतो, त्यातून कटूता येते. त्या दोघी तरूणींनी देऊ केलेली सीट मी घेतली नाही, पण त्या दोघी मला खुप मोठे समाधान देऊन गेल्या. आजवर किती गरजूंना असे समाधान आरक्षणातून मिळू शकले आहे?

२ टिप्पण्या: