शनिवार, २१ जुलै, २०१२

सत्यमेव न दिसतेकिती छान छायाचित्र आहे ना? नॅशनल जिओग्राफ़िकच्या संग्रहातील ते एक अप्रतिम छायाचित्र आहे. पण जे डोळ्यांना इतकी भुरळ घालते ते सगळेच खरे असते का? कारण डोळ्यांना समोरचे सगळेच दिसत असते. पण आपण त्यातले किती बघत असतो? बहुतेक प्रसंगी समोर दिसते ते आपण बघतच नाही. तर त्यातले आपल्याला हवे तेच बघत असतो. मग बघतो तेवढेच दिसते, म्हणून तेवढ्हेच असते,  अशा भ्रमात समाधानी असतो. आणखी वर मोठ्या छातीठोकपणे जगाला सांगतो, की ‘स्वत:च्य़ा डोळ्यांनी बघितले आहे’. पण खरेच आपण आपल्या डोळ्यांनी किती बघत असतो आणि दुसर्‍यांच्या डोळ्यांनी किती बघत असतो? दुसर्‍यांच्या डोळ्यांनी म्हणजे दुसरे जे दाखवू इच्छितात तेवढेच आपण बघतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यांनीच बघता असतो ना? मग डोळे आपले असतात, पण त्या दुसर्‍यांना हवे तेच आपण बघत असतो. पण सांगताना मात्र ‘स्वत:च्या डोळ्यांनी बघितले’ असा दावाही करत असतो. सोबत जोडलेले छायाचित्र त्याचा उत्तम नमूना आहे. तो कॅमेरामन आपल्याला दाखवतो आहे तसे आपण बघतो आहोत. म्हणुनच उंटांचा चाललेला तांडा आपण बघू शकतो. पण आपल्याला उंटांचा तांडा दिसतच नाही. जे समोर दिसत आहेत त्या उंटांच्या सावल्या आहेत. ज्यांना आपण ऊंट म्हणून बघतो आहोत, त्या सावल्या आहेत. खरे उंट सावल्यांच्या पायाच्या तळाशी खुप निरखून बघितले तर दिसू शकतील. पांढुरक्या करड्या रंगातल्या लांबड्या आकृती खर्‍या उंटाच्या आहेत.

पण त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, चित्राकडे बारकाईने बघायला हवे. नाहीतर असा दृष्टीभ्रम होत असतो. आणि हे इथेच किंवा याच छायचित्रापुरते मर्यादित नाही. आजच्या संचारक्रांतीच्या जमान्यात तर रोजच घरातल्या छोट्या पडद्यावर किती दृष्टीभ्रम आपल्या वाट्याला येत असतात ना? जे घडत असते, त्यातले आधी रिपोर्टर ठरवतो, की काय दाखवायचे. मग त्यातून कॅमेरामन ठरवतो कुठल्या कोनातून दाखवायचे, ते वाहिनीच्या संपादकापर्यंत आले मग तो त्यातले निवडतो आणि तेवढेच आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. आणि आपण खुश असतो, की आपल्याला सर्व सत्य गवसले आहे म्हणून. पण सत्यापासून आपण मैलोगणती दुर असतो. म्हणुनच थॉमस जेफ़रसन म्हणतो, "ज्याचे मन असत्य व गैरसमजुतींनी व्यापले आहे त्याच्यापेक्षा ज्याला काहीच माहित नाही, तोच सत्याचा अधिक जवळ असतो."  

३ टिप्पण्या: